सावित्रीबाई फुले यांची जयंती आज उत्साहाने साजरी केली जात आहे. भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाईंच्या जीवनाचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्या काळात स्त्री स्वातंत्र्याची कल्पनाही अशक्य वाटत होती. “स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील,” असा प्राचीन समज होता. अशा वेळी सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
भिडे वाडा: शिक्षणक्रांतीची पहिली पायरी, ज्यात शिक्षणाचे बीज रुजले व क्रांती सुरु झाली
पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. हे स्थान फक्त वास्तू नसून भारतीय स्त्रीशिक्षणासाठीचे पवित्र स्थान आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने या वाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. आम्ही सर्व मराठी बांधवांनी त्या घोषणेला प्रचंड पाठिंबा दिला होता. परंतु, दुर्दैवाने हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकले दिसत आहे व कोणाला त्याची परवा नाही. काही प्रकरणे न्यायालयात होती, जी आता निकाली लागली आहेत. हे काम अधिक वेळ थांबू नये, अशी आशा आहे. या स्मारकाला फक्त संग्रहालय किंवा पुतळ्यापुरते मर्यादित न ठेवता त्यात आधुनिकतेचा समावेश व्हावा. एक डिजिटल लायब्ररी, बहुभाषिक साउंड आणि लाईट शो यासारख्या गोष्टींनी हे स्मारक समृद्ध केले पाहिजे.
सरकारी लालफितीत अडकलेली अनेक स्मारके आपण पाहतो. भिडे वाड्याचे स्मारक देखील त्याच मार्गाने जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकारने ठराविक कालमर्यादेत हे काम पूर्ण करावे. यासोबतच, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.
आजच्या काळातील सावित्रीबाईंचे खूप महत्त्व आहे. सावित्रीबाईंचा वारसा आजही प्रेरणादायी आहे. आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली आहे. अंतराळात झेप घेणाऱ्या महिलांपासून उद्योगांच्या शिखरावर पोहोचलेल्या स्त्रियांपर्यंत सर्वांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणक्रांतीचा वारसा पुढे नेला आहे. सावित्रीबाईंचा संघर्ष केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित नव्हता. तो प्रत्येक स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी प्रेरणादायी आहे. भिडे वाड्याच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होऊन, ते एक प्रेरणादायी केंद्र होईल, अशी अपेक्षा आहे. सावित्रीबाईंच्या कार्याला खऱ्या अर्थाने आदर तेव्हाच मिळेल.