भारताची आध्यात्मिक संस्कृती समाजाला जोडण्याचे, करुणा वाढविण्याचे, आणि सेवेकडे नेण्याचे कार्य करते. याच सेवाभावाला अधिष्ठान मानून शासन कार्यरत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड येथे केले. इस्कॉन प्रकल्पातील श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
सेवाभावातून भारताचा अध्यात्मिक वारसा
भारत देश केवळ भौगोलिक सीमांचे प्रतीक नसून जिवंत संस्कृतीचे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकांचा दाखला देत, खरी सेवा ही नि:स्वार्थी असल्याचे नमूद केले. सेवाभावाच्या या तत्त्वावर भारताची संस्कृती उभी आहे. इस्कॉनच्या माध्यमातून गीतेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. इस्कॉनचे वैदिक शिक्षण केंद्र, संग्रहालय, व उपासना स्थळे समाजाला जोडण्याचे कार्य करीत आहेत.
सांस्कृतिक वारसाचा विकास
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या दशकात भारताने विकास व सांस्कृतिक वारसा यामध्ये प्रगती साधली आहे. इस्कॉन सारख्या संस्था या वारसाच्या संवर्धनात मोलाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये मंदिरांचे महत्त्व अधोरेखित होत असून, हे केंद्र समाजाला शिक्षण व कौशल्ये पुरवितात. रामायण व महाभारत यावर आधारित संग्रहालय आणि वृंदावनाच्या प्रेरणेने तयार होणारी बाग ही नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.
सरकारचे सेवाभाव प्रेरित उपक्रम
पंतप्रधानांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जसे की प्रत्येक घरात शौचालय, गॅस कनेक्शन, नळाला पाणी, आणि मोफत वैद्यकीय सेवा यांचा उल्लेख केला. या योजना सेवाभावाच्या तत्वावर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. कृष्णा सर्किटद्वारे धार्मिक स्थळांचे जाळे जोडण्याचे प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले. यामुळे देशातील श्रद्धास्थळांना जागतिक स्तरावर मान्यता मिळेल.
इस्कॉनच्या योगदानाचे कौतुक
पंतप्रधानांनी इस्कॉनच्या शैक्षणिक, आरोग्य, व पर्यावरणविषयक उपक्रमांचे कौतुक केले. कुंभमेळ्यादरम्यान इस्कॉनच्या महत्त्वपूर्ण सेवेचा त्यांनी उल्लेख केला. इस्कॉनचे सदस्य जागतिक पातळीवर मानवतावादी मूल्ये पोहोचविण्यास हातभार लावत आहेत. मंदिर संकुलातील भक्तिवेदांत आयुर्वेदिक केंद्र आणि वैदिक शिक्षण महाविद्यालय यामुळे समाजाला लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
सेवाभावातून प्रेरित दिशा
पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवेवर असल्याचे ठामपणे मांडले. सेवा हाच सामाजिक न्याय व खऱ्या धर्मनिरपेक्षतेचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. इस्कॉनच्या पुढाकारामुळे नवीन पिढीला अध्यात्माची प्रेरणा मिळेल व सेवा आणि समर्पणाच्या मार्गाने त्यांचा विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताची आध्यात्मिक संस्कृती आणि इस्कॉनच्या सेवाभावाचा पाया जागतिक स्तरावर भारताला आध्यात्मिक नेतृत्व देईल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.