
वर्धा, सोमवार 23 डिसेंबर: सुकली (बाई) येथील बँक ऑफ इंडिया बँकेत चोरट्यांनी पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु अलार्ममुळे बँकेतील रोख रक्कम आणि सोने सुरक्षित राहिले. ही घटना सकाळी उजेड झाल्यावर एका ग्रामस्थांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत फुटलेली असल्याचे पाहिल्यानंतर उघडकीस आली. बँकेने तत्काळ तपास सुरू केला असून कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित आरोपी दिसून आले आहेत.
सुकली बँकेत चोरीचा प्रयत्न
या दोघांनी मध्यरात्री बँकेची कॉंक्रिटची भिंत तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. बँक मुख्य रस्त्यावर असली तरी शेजारील शेताला लागून आहे, त्यामुळे भविष्यातही चोरटे सहजपणे बँकेत घुसण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, दिवसा देखील बँकेत सुरक्षा रक्षक तैनात नसतात, रात्री तर दूरच. ही घटना बँक ऑफ इंडियासाठी मोठा धोका आहे. या घटनेतून धडा घेत बँकेने सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये आणि पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये.
सुकली गावासह गिरणाला, मालेगावठाण, अकोली, तमुसवाडा, कारखाना, म्हसळा, गिरोली आणि अनेक लहान गावांतील शेतकरी आणि व्यापारी या बँकेत सोने आणि पैसे जमा करतात. त्यामुळे या घटनेमुळे या भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी बँकेकडून त्वरित प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.